छत्रपती संभाजीनगर * दैनिक मराठी * वर्ष - १५ वे

Date

Pankaja Munde : पंकजा मुंडेंचं वक्तव्य, “मी बीडची कन्या आहे, पालकमंत्रिपद दिलं असतं तर…”

राजकारण
पंकजा मुंडे यांनी आपण धनंजय मुंडे प्रकरणाबाबत काहीही भाष्य करणार नाही असंही सांगितलं आहे.

Pankaja Munde : महाराष्ट्रात नुकतेच जिल्ह्यांचे पालकमंत्री कोण हे ठरवलं गेलं आहे. महायुती सरकार स्थापन होऊन दीड महिना झाल्यानंतर पालकमंत्री निश्चित झाले आहेत. यामध्ये चर्चा होती ती बीडच्या पालकमंत्री या पदाची. बीडचं पालकमंत्री हे पद अजित पवारांनी किंवा देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावं अशी मागणी होत होती. कारण बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर महिन्यात हत्या करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणात धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याला खंडणी प्रकरणात अटक झाली. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींनाही अटक झाली. मात्र या प्रश्नावरुन राजकारण रंगलं होतं. दरम्यान पंकजा मुंडे यांनी आता बीडचं पालकमंत्री केलं असतं तर बरं झालं असतं असं म्हटलं आहे. बीडच्या पालकमंत्रिपदी अजित पवार राज्यातील पालकमंत्री पदाची यादी १८ जानेवारीला जाहीर करण्यात आली. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रिपद असणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहर तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. मात्र, पालकमंत्री पदाच्या यादीतून धनंजय मुंडे यांना वगळण्यात आलं आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलेलं नाही. पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या? आज मी नागपूरमध्ये आलेली आहे कारण माझ्या खात्याचा पूर्वनियोजित कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमासाठीच मी नागपूर दौऱ्यावर आहे. असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. यानंतर त्यांना पालकमंत्रिपदाबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी त्याबाबतही भाष्य केलं. बीडच्या पालकमंत्री या पदाबाबत काय म्हणाल्या पंकजा मुंडे? “मला जालन्याचं पालकमंत्रिपद मिळालं आहे. मला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मला जी संधी मिळते तेव्हा ती संधी मी अनुभव म्हणून घेत असते. कायमच तुम्हाला एकच काम करायला मिळेल असं होत नाही. मी पाच वर्षे कुठल्याच संविधानिक पदावर नव्हते तरीही संघटनेचं काम केलं. मला बीडचं पालकमंत्री केलं असतं तर बरं झालं असतं कारण मी बीडची कन्या आहे. बीडकरांनाही याचा आनंद झाला असता. माझा पाच वर्षांचा कार्यकाळ बीडच्या इतिहासातील विकसनशील राहिलेला आहे हे कुणीही मान्य करेल. पण जे निर्णय झाले आहेत त्याबाबत असहमती न दर्शवता जी जबाबदारी मिळाली आहे त्याबाबत चांगलं काम करण्याची भूमिका माझी आहे. अजित पवार हे बीडचे पालकमंत्री म्हणून चांगलं काम करतील याबद्दल मला काहीही शंका नाही. मला जालन्याची जबाबदारी देण्यात आली आहे ती मी पार पाडेन.” असं पंकजा मुंडे म्हणाल्या. धनंजय मुंडेंबाबत विचारलं असता, “कोण कुणाला काय म्हणालं? यावर मी कसं भाष्य करणार? मी माझ्या भूमिकेबद्दलच बोलू शकते.” असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

बीड

प्रकाशवार्ता · 20-01-2025 · 11:53 AM

Popular News